आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा मोठा उलटफेर! सराफा बाजारात नवीन दर जाहीर, 10 ग्रॅमचा भाव आता…

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांमुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांना अखेर दिलासा मिळाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारातून मोठी अपडेट समोर आली असून देशभरात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. अधिकमासाच्या सुरुवातीलाच दर कमी झाल्याने दागिने आणि आभूषणांच्या खरेदीला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सोन्याच्या आयातीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता चांदीच्या आयातीवरही नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीदेखील बाजारात सोनं-चांदी खरेदी करण्याचा उत्साह कायम असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत सोनं आणि चांदीचे दर सातत्याने वाढत होते. मात्र 18 मे रोजी सकाळपासून दरात घसरण नोंदवण्यात आली.
राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1,57,070 रुपयांवर आला असून 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,990 रुपये इतका आहे. मुंबई, कोलकाता, पुणे आणि बंगळुरू येथे 24 कॅरेट सोनं 1,56,920 रुपये तर 22 कॅरेट सोनं सुमारे 1,43,850 रुपयांवर विकले जात आहे. चेन्नईमध्ये मात्र सोन्याचे दर तुलनेने अधिक असून 24 कॅरेट सोन्यासाठी 1,60,910 रुपये मोजावे लागत आहेत.

चांदीच्या दरातही घसरण झाली असून 18 मे रोजी चांदीचा भाव प्रति किलो 2,79,900 रुपयांवर आला आहे. गेल्या आठवड्यात चांदीत तब्बल 5 हजार रुपयांची वाढ झाली होती. जानेवारी महिन्यात चांदीने 4 लाख रुपयांचा उच्चांक गाठला होता.

तज्ज्ञांच्या मते, डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आला आहे. अमेरिका-इराण तणाव, होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबतची चिंता यामुळे जागतिक बाजारपेठेत सावध वातावरण निर्माण झाले आहे.