राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; स्वतःवरील हल्ल्याचा कट रचल्याचा पोलिसांचा दावा…


बारामती : राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे व्यावसायिक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावरील कथित हल्ला प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सूर्यवंशी यांनी स्वतःवर हल्ला घडवून आणल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी उघड झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

१८ ऑक्टोबर रोजी बारामती परिसरात राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन आरोपींना अटक केली असून, एका अल्पवयीनालाही ताब्यात घेण्यात आले होते. तपासादरम्यान हल्ल्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचा आरोपही समोर आला होता.

सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला नवी दिशा

पोलिसांच्या माहितीनुसार, राणा सूर्यवंशी यांच्या जवळच्या तीन व्यक्ती त्यांच्या डिफेंडर गाडीतून हल्ल्यासाठी सुपारी घेतल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे. हल्ल्यानंतर या व्यक्ती सूर्यवंशी यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांच्यासोबत होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

मात्र, तपासादरम्यान पोलिसांचा संशय या व्यक्तींकडे वळल्यानंतर त्या तिघांचे फोन बंद असल्याचे आणि त्या संपर्काबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाला आहे.

हल्ल्यामागचे नेमके कारण काय?

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दत्त कला शिक्षण संस्थेशी संबंधित वाद आणि यापूर्वी करण्यात आलेल्या तक्रारींचाही उल्लेख चर्चेत येत आहे. संस्थेच्या कारभारावरून संबंधित व्यक्तींमध्ये मतभेद असल्याचे आरोप यापूर्वी करण्यात आले होते. मात्र, या वादाचा हल्ल्याशी नेमका संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संशयित व्यक्तींची भूमिका आणि हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांच्या दाव्यांची आणि आरोपांची अंतिम सत्यता तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!