बर्ड फ्लूचा महाराष्ट्रात मोठा उद्रेक; 5 दिवसांचं ऑपरेशन सुरू


नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूने पुन्हा एकदा मोठा उद्रेक केला आहे. H5N1 विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले असून मोठ्या प्रमाणावर कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

नवापूर भागात एकूण 27 पोल्ट्री फार्म असून त्यापैकी अनेक ठिकाणी संसर्ग आढळल्याने तब्बल 1 लाख 40 हजार कोंबड्यांचा नाश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कोंबड्यांना पोत्यात भरून सुरक्षित पद्धतीने खड्ड्यात पुरलं जात आहे, तर मोठ्या प्रमाणात अंडीही नष्ट केली जात आहेत. ही संपूर्ण मोहीम पुढील 5 दिवसांत पूर्ण करण्याचं प्रशासनाचं लक्ष्य आहे.

डायमंड पोल्ट्री फार्ममध्ये अचानक कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर तातडीने कारवाईचा निर्णय घेण्यात आला. सध्या प्रत्येक पोल्ट्री फार्मची तपासणी सुरू असून संसर्गाचा विस्तार रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवल्या जात आहेत.

या परिस्थितीमुळे पोल्ट्री व्यवसायावर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. मोठ्या कोंबडीसाठी 140 रुपये, लहान कोंबडीसाठी 120 रुपये आणि प्रत्येक अंड्यासाठी 4 रुपये भरपाई देण्यात येणार आहे.

दरम्यान, या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याबाबतही खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बर्ड फ्लू प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये पसरतो, मात्र संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात आल्यास किंवा अपुरी शिजवलेली चिकन व अंडी खाल्ल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो.

मानवांमध्ये संसर्ग झाल्यास ताप, खोकला, घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे चिकन आणि अंडी नीट शिजवूनच खावीत, तसेच संशयित लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

सध्या प्रशासनाकडून परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!