UPI युजर्ससाठी मोठा बदल! आता ‘हा’ महत्त्वाचा नियम लागू होणार; Google Pay, PhonePe युजर्सवर थेट परिणाम

मुंबई : डिजिटल पेमेंट करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने Google Pay, PhonePe, Paytm आणि इतर UPI सेवा पुरवठादारांसह भागीदार बँकांना नव्या गोपनीयता नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या बदलांमुळे व्यवहारादरम्यान वापरकर्त्यांचा मोबाईल क्रमांक आणि इतर वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित राहणार आहे.
एनपीसीआयने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नियमांच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला असून, सर्व UPI सेवा पुरवठादारांना 4 सप्टेंबरपर्यंत नव्या नियमांची अंमलबजावणी पूर्ण करण्यास सांगितले आहे.

नव्या नियमांनुसार, UPI व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांचा संपूर्ण मोबाईल क्रमांक किंवा इतर संवेदनशील वैयक्तिक माहिती समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही. यामुळे ऑनलाइन व्यवहारांमध्ये गोपनीयतेचे संरक्षण अधिक मजबूत होणार आहे.


यापूर्वीही एनपीसीआयने मोबाईल क्रमांक लपवण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सोशल मीडियावर अनेक वापरकर्त्यांनी यासंदर्भात तक्रारी केल्यानंतर, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा आणि वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय, ग्राहकांना दिसणाऱ्या सर्व इंटरफेसमध्ये UPI आयडी, मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याशी संबंधित माहिती सुरक्षित पद्धतीने लपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. QR कोडद्वारे पेमेंट करताना मोबाईल क्रमांकातील केवळ शेवटचे चार अंक दिसतील, तर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण क्रमांक लपवला जाईल.
एनपीसीआयने UPI सेवा देणाऱ्या सर्व ॲप्सना मोबाईल क्रमांकाऐवजी स्वतंत्र युझरनेम-आधारित UPI ID तयार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या बहुतांश ग्राहक मोबाईल क्रमांकालाच UPI ID म्हणून वापरत असल्याने हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
या बदलांमुळे अनोळखी व्यक्तींपर्यंत मोबाईल क्रमांक पोहोचण्याचा धोका कमी होईल. परिणामी, अनावश्यक कॉल आणि संदेशांपासूनही ग्राहकांना अधिक संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, एनपीसीआय सर्व ऑटो-पे व्यवहारांची माहिती एकाच ठिकाणी पाहता येईल, अशा नव्या सुविधेवरही काम करत आहे. या फीचरमुळे विविध UPI ॲप्सवरील ऑटोमॅटिक पेमेंट्सचे व्यवस्थापन अधिक सोपे होणार आहे.