कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांची ४८ हजार कोटींची थकीत वीजबिले माफ

मुंबई : राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले पूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिजे आणि त्या कोऱ्या पाटीवर महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिता आला पाहिजे, या उद्देशाने आम्ही हा धाडसी निर्णय घेतला आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जमाफी आणि थकीत वीजबिलांबाबत आपण नेहमीच राज्याच्या आर्थिक शिस्तीची भूमिका मांडली होती. मात्र, महायुतीतील सहकारी नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत सरसकट कर्जमाफी आणि थकीत वीजबिल माफीचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “फक्त राजकारण करायचं असतं, तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी जाहीर केली असती. पण आम्ही शेतकऱ्यांच्या हितावर राजकारण करत नाही. राजकारण करू, पण बळीराजाच्या जीवावर नाही,” असे फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले, “अनेकांना वाटत होतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि थकीत वीजबिलांच्या मुद्द्यावर त्यांचं राजकीय दुकान कायम चालत राहील. पण हे ‘देवाभाऊंचं’ सरकार आहे. आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो,” असा टोला त्यांनी लगावला.