लाडक्या बहिणींना महायुतीचा ठेंगा ; तब्बल 1 लाख 4 हजार महिला योजनेतून बाद….

पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाटा ठरला.विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा डंका वाजवत सरसकट सर्वच महिलांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा सरकारने केली होती.मात्र या योजनेत अनेक भाऊरायांनी शिरकाव केल्यानंतर निकषांची गाळणी लावण्यात आली. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. आता नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यात अनेक बहिणीनां भाऊरायांनीं ठेंगा दिला आहे. या योजनेतून आता एक लाख चार हजार महिला बाद झाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 20 हजार लाडक्या बहिणी वयाच्या निकषात बसत नसल्याचे तपासणीत समोर आले. या लाडक्या बहिणी एकतर 20 वर्षांखालील अथवा 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या असल्याची माहिती पडताळणी समोर आली आहे. तर 84 हजार अर्ज हे एकाच घरातील 3 महिलांचे असल्याचे समोर आले. सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यात एकाच घरातील तीन अथवा त्यापेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 1 लाख 4 हजार महिला आता या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. या बहिणींचे 1500 रुपयांचे मानधन तातडीने थांबवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बहिणींना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान राज्यात 26 लाख संशयित लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कार्यवाही करण्यात आली आहे. आता इतर जिल्ह्यात सुद्धा अशी कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही काळात लाभार्थ्यांची संख्येत मोठी कपात होण्याची शक्यता आहे.