महाराष्ट्रावर पावसाचा ‘रेड अटॅक’! पुढील 24 तास निर्णायक; घाटमाथा धोक्यात, धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात

मुंबई : राज्यात तब्बल दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा दमदार पुनरागमन केले असून, पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, रत्नागिरी, नाशिक आणि विदर्भातील काही भागांतही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरापासून मध्य भारतापर्यंत सक्रिय झालेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातून येणारे दमट वारे यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन, सखल भागांत पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे कडवा धरणातून ३७४ क्युसेक, भावली धरणातून १,२१८ क्युसेक आणि पालखेड धरणातून १,३९२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि मका पिकांना दिलासा मिळाला आहे. जालना जिल्ह्यासह अनेक भागांत मध्यरात्रीपासून रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अनेक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस समाधानकारक ठरला असला, तरी काही भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका कायम असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांपासून दूर राहावे आणि हवामान विभागाच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


