आज ‘महाराष्ट्र बंद’! काय सुरू राहणार, काय बंद? घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या

मुंबई : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज (गुरुवारी) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेस, डावे पक्ष, काही शैक्षणिक संस्था, कोचिंग सेंटर्स आणि कामगार संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बंदची घोषणा करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवला. मात्र, दवाखाने, मेडिकल, दूध पुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात बस आणि लोकल सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी काही ठिकाणी आंदोलनांमुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवली असून, संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. नांदुरा–बुऱ्हाणपूर मार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यातील इतर भागांतही बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.