महादेव कांचन फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा इंडियन जिनोमिक्स, हैदराबाद येथे शैक्षणिक दौरा

पुणे : उरुळी कांचन येथील महादेव कांचन कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (B. Pharmacy आणि D. Pharmacy) च्या विद्यार्थ्यांनी इंडियन जिनोमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद येथे शैक्षणिक दौरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गोष्टी जाणून घेतल्या.
या दौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक औषध संशोधन आणि पशुवैद्यकीय उत्पादने (Veterinary Products) यांची माहिती देणे हा होता. इंडियन जिनोमिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पशुवैद्यकीय औषध निर्मिती, आनुवंशिक संशोधन आणि बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखली जाते.
दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळेतील विविध संशोधन प्रक्रिया, मॉलिक्युलर बायोलॉजी आणि पशुवैद्यकीय औषध निर्मितीतील अत्याधुनिक पद्धती समजून घेतल्या. यावेळी तज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांचे शंका निरसन केले.
या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना औषध उद्योगातील नवीन तंत्रज्ञान आणि संशोधन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव कांचन, सचिव डॉ. अजिंक्यदादा कांचन, कार्यकारी संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि अशा शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले.
या दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन एम. गवई, प्रा. कुणाल हाके आणि सर्व प्राध्यापक वर्गाने विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यात अशाच औद्योगिक दौऱ्यांची अपेक्षा व्यक्त केली.