प्रेम विवाह करायचाय? मग जरूर करा, सरकार करणार मदत, राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या..

मुंबई : प्रेमाच्या बंधनाला जाती-धर्माचे अडथळे पार करून विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ऑनर किलिंग’च्या घटना रोखण्यासाठी, अशा नवविवाहित जोडप्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘सेफ हाऊस’ उभारण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत.

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय मुला-मुलींच्या प्रेमविवाहांमुळे अनेकदा कुटुंबीयांकडून त्यांचा छळ केला जातो. हे ‘ऑनर किलिंग’ सारखे प्रकारही घडतात. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये ‘ऑनर किलिंग’च्या चार घटना घडल्या आहेत.
अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांच्या जीवाला असलेल्या धोक्यांवर मात करण्यासाठी गृह मंत्रालयाने सर्व पोलीस आयुत्कालये आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांना सेफ हाऊस उभारण्याचे आदेश जारी केले आहेत.

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर जर नवविवाहित जोडप्याच्या जीवाला कुटुंबीयांकडून किंवा समाजाकडून धोका असेल, तर त्यांना ‘सेफ हाऊस’मध्ये तात्पुरता आश्रय दिला जाईल. या ठिकाणी सशस्त्र पोलिसांचा २४ तास पहारा असेल. तसेच, ‘सेफ हाऊस’मध्ये राहण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल. नवविवाहित जोडपे येथे एक महिना ते एक वर्षापर्यंत राहू शकतात.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात एक ‘सेफ हाऊस’ उभारले जाईल. या कामाची जबाबदारी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.