कोल्हापुरातील १० गावांना लागणार लॉटरी! बावनकुळेंनी केली मोठी घोषणा, नेमकं कशासाठी?

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील १० पेक्षा अधिक गावांतील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. चोकक ते अंकली राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत आता शेतकऱ्यांना चौपट मोबदला दिला जाणार आहे. अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं आहे.
मुंबईत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे मोठे आश्वासन देण्यात आले आहे. या बैठकीला खासदार धैर्यशील माने, आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, तसेच इतर आमदारही उपस्थित होते. या बैठकीत चोकक ते अंकली रस्त्यावरच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
दरम्यान, या प्रस्तावित महामार्गात बाधित होणाऱ्या गावांमध्ये चोकक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले, तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, उमळवाड, उदगाव आणि अंकली यांचा समावेश आहे. यापूर्वी या शेतकऱ्यांना फक्त दुप्पट मोबदला देण्याचा विचार केला जात होता. मात्र इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळत असल्याने कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनीही समान न्यायासाठी आंदोलन उभारलं होते.
राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनीही यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी उपोषण करत भूसंपादन प्रक्रियेला विरोध केला होता. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली असून, त्यात चौपट भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे.