केसनंदमध्ये तरुणाला गाडीसह लुटणाऱ्या दोघा आरोपींना लोणीकंद पोलिसांनी शिताफीने अटक…!

पुणे : तरुणाला अडवून त्याचा मोबाईल व गाडी चोरुन नेणार्या दोघा जणांना लोणीकंद पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गेल्या ३० दिवसात लोणीकंद पोलिसांनी ८ गावठी पिस्तुले आणि २६ जिवंत काडतुसे जप्त करुन संभाव्य गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.

सचिन राजाराम ढोरे (वय ३८, रा. ढोरे वस्ती, केसनंद, ता. हवेली) आणि मंथन दत्तात्रय धुमाळ (वय २६, रा. साईनगर, खराडी, चंदननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तरुणाला अडवून त्याचा मोबाईल व गाडी चोरुन नेण्याचा प्रकार लोणीकंदमध्ये १४ सप्टेबर रोजी घडला होता. याचा तपास सुरु असताना पोलीस नाईक स्वप्निल जाधव यांना २८ सप्टेंबरला पहाटे बातमीदारांकडून माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी केसनंद येथील बांगर वस्तीत सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये १ गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे तसेच मारुती स्विप्ट कार असा ५ लाख २३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. न्यायालयाने दोघांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
लोणीकंद पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली मागील ३० दिवसात ८ गावठी पिस्तुले व २६ जिवंत काडतुसे जप्त करुन शहरातील गुन्हेगारीस आळा घालून मोठी कामगिरी केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस अंमलदार संदीप तिकोणे, कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, सांगर जगताप, शुभम चिनके, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, दिपक कोरे, सुधीर शिवले, विशाल गायकवाड, प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी केली आहे.