Loksabha Election 2024 : काय सांगता! सोलापूरमध्ये चक्क रेड्यावर बसून यमदेवाने भरला उमेदवारी अर्ज…

Loksabha Election 2024 : कडाक्याचं ऊन आणि त्यात तापत असणारं राजकारण, अशा संमिश्र वातावरणात उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरत आहेत. विशेष म्हणजे विविध पक्षांचे उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने आपला अर्ज भरत आहेत.
काही उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरत असताना मोठमोठी रॅली काढली जात आहे. या रॅलीतून प्रचंड शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. सोलापुरात मराठा बांधवांकडून अनोखे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले.
मराठा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी रेड्यावर बसून यमाचा वेशभूषा करून आपला उमेदवारी अर्ज भरला. याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या वर्षभरात मराठा समाजाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेत उमेदवार देणार नसल्याची भूमिका घेतली. तरीही काही ठिकाणी मराठा समाजाने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातही मराठा समाजातर्फे उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. Loksabha Election 2024
मराठा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज आपला अर्ज भरला. यावेळी त्यांचे वाहन आणि वेशभुषा आकर्षणाचा विषय ठरली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे. केंद्रात बोकाळलेला भ्रष्टाचार याच्या विरोधात माढा लोकसभा मतदासंघातून अर्ज भरला असल्याचे रामभाऊ गायकवाड यांनी सांगितले.
सात रस्ता परिसर ते जिल्ह्याधिकारी कार्यालयापर्यंत रामभाऊ गायकवाड रेड्यावर बसून यमाच्या वेशभूषेत होते. यमदेवाची नक्कल करत कार्यकर्त्यांसह जिल्ह्याधिकरी कार्याल्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अर्ज भरला आहे. याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.