बारामतीत लोकसभेचा रणसंग्राम आज संपणार ! भावनिक विरुद्ध सहानभूतीचा मुद्दा पेटणार ..!!
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराची सांगता असल्याने संपूर्ण दिवसभर प्रचाराचा धडका सुरू आहे. आज अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे व रोहित पवार आज संपूर्ण दिवस बारामती मतदारसंघात असणार आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार भोर मधून त्यांच्या सभांना सुरुवात करतील. भोर मधील सभा संपल्यानंतर त्यांची इंदापूरमध्ये सांगता सभा असेल आणि त्यानंतर बारामती मध्ये जुना मोरगाव रस्त्यावरील लेंडी पुलानजीक सांगत सभा असेल, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भोर तालुक्यातील दोन सभा सकाळी होतील. दौंड तालुक्यातील वरवंड येथील सभा व इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरातील सभा होणार असून बारामतीतील सांगता सभा मिशन ग्राउंड या ठिकाणी होणार आहे. त्यापूर्वी जय पवार हे शारदा प्रांगण येथून मिशन ग्राउंड पर्यंत पदयात्रा काढणार आहेत.
गेल्या अनेक सभांमधून उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेवटच्या सभेत शरद पवार तुम्हाला भावनिक करतील असे सांगत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. ते या शेवटच्या सभांमधून नेमका काय संदेश देतात याकडे मतदारांचेही लक्ष लागून राहिले आहे.