आज संध्याकाळी ४ वाजताच दारूची दुकानं बंद! नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना फटका, किती दिवस राहणार ड्राय डे?

नागपूर : मद्यप्रेमींनो, आज संध्याकाळपासून दारू मिळणार की नाही, असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे प्रशासनाने काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजल्यापासून सुरू होणारी ही बंदी २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. मात्र, हा आदेश संपूर्ण महाराष्ट्रासाठी नसून नागपूर पदवीधर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांपुरताच मर्यादित आहे.

नेमकी कधीपासून आणि कधीपर्यंत बंदी?
प्रशासनाच्या निर्देशानुसार, संबंधित जिल्ह्यांमध्ये २१ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजल्यापासून २३ ऑक्टोबरला संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दारूची दुकानं बंद ठेवावी लागणार आहेत. या काळात मद्यविक्रीला परवानगी नसेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मद्यविक्रेत्यांनी आदेशाचं पालन करावं, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.


पाच मतदारसंघांत निवडणुकीची रणधुमाळी
राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि मराठवाडा पदवीधर या पाच मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. या निवडणुकीत एकूण १८२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
मतदानासाठी २,४१९ केंद्रांची तयारी
पाचही मतदारसंघांमध्ये मतदानासाठी एकूण २ हजार ४१९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर पदवीधर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी नाही!
या निर्णयामुळे सर्व जिल्ह्यांतील दारूची दुकानं बंद राहणार असल्याचा समज करून घेऊ नका. उपलब्ध माहितीनुसार, हा आदेश नागपूर पदवीधर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांसाठीच लागू आहे. त्यामुळे संबंधित भागातील मद्यप्रेमींना २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दारू मिळणार नाही. इतर जिल्ह्यांतील नियमांसाठी स्थानिक प्रशासनाच्या अधिकृत सूचनांची खात्री करावी.
