Koregaon Mul : कोरेगावमूळच्या उपसरपंचासह एक सदस्य अपात्र, सरकारी जागेतील अतिक्रमण भोवलं….!!


Koregaon Mul : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंचासह एका सदस्याला अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे पूर्व हवेलीत एकच खळबळ उडाली आहे. सरकारी जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने ही अपात्रतेची कारवाई केल्याची माहिती आहे.

विद्यमान उपसरपंच मंगल जगन्नाथ पवार व सचिन गुलाब निकाळजे अशी अपात्र ठरविण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

संबंधित अपात्रतेच्या आदेशाची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, हवेली तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, कोरेगाव मूळचे ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव मूळ येथील कानिफनाथ दादू पवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे विद्यमान उपसरपंच मंगल पवार यांच्याविरुद्ध सदस्यत्व रद्द करण्याबाबत तक्रार केली होती. तसेच निखील पिराजी पवार यांनी सचिन गुलाब निकाळजे यांच्याविरुद्ध सरकारी गायरान जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी तक्रार केली होती. Koregaon Mul

दरम्यान, या तक्रारीनुसार, कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी गायरान जागेत अतिक्रमण करत सरकारी जागेचा बेकायदा वापर केला आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व कायद्याने अपात्र होत असल्यामुळे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी दोघांनीही केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जाता जाता ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ज (३) चा संदर्भ देण्यात आला होता. या अर्जावर तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या दालनात वेळोवेळी सुनावणी झाली. अर्जदारांनी सादर केलेली कागदपत्रे व ग्रामसेवक व गटविकास अधिकारी, तहसीलदार यांचे अहवाल तपासून जिल्हाधिकारी यांनी अर्जदारांचा विवाद अर्ज मंजूर करत, वरील चार सदस्यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरवले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने दोन सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाल्याने हवेली तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर विरोधी गटात आनंदाचे वातावरण आहे. संबंधितांच्या प्रभागात पोटनिवडणूक लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!