केतन अग्रवाल हत्याकांडाचं बीड कनेक्शन समोर; चेतन-सियाने सर्वात आधी हत्येचा प्लान कोणाला सांगितला?

पुणे : गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी चेतन चौधरीच्या वर्गमित्राचे नावही तपासात समोर आले असून, केतनच्या हत्येचा कट सर्वप्रथम त्यालाच सांगण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. सध्या पुणे ग्रामीण पोलीस या तरुणाची चौकशी करत असून, त्याची नेमकी भूमिका काय होती याचा तपास सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी केतन अग्रवालला संपवण्याच्या कथित योजनेबाबत आपल्या वर्गमित्राशी चर्चा केली होती. तसेच १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर येण्याचे निमंत्रणही त्याला दिले होते. मात्र, त्याने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.
तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. केतनची हत्या झाल्यानंतर चेतन चौधरीने या वर्गमित्राची भेट घेतल्याचे तसेच सिया गोयलसोबतही त्याचे संभाषण झाल्याचे तपासात आढळून आले आहे. त्या भेटीत आणि संभाषणात नेमकी काय चर्चा झाली, याचा तपास सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याच्या अखेरीस त्याचा चेतन चौधरीशी संपर्क झाला होता. आता पोलीस कॉल डिटेल रेकॉर्ड, चॅट, लोकेशन हिस्ट्री आणि इतर डिजिटल पुरावे तपासत आहेत.

तपासात असेही समोर आले आहे की, संबंधित तरुणाने आरोपींना हत्या करू नका, असा सल्ला दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्याला कटाची माहिती असतानाही त्याने पोलिसांना याबाबत माहिती का दिली नाही, हा तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.
दरम्यान, पोलिसांनी अद्याप या तरुणाला आरोपी म्हणून घोषित केलेले नाही. त्याच्याकडे उपलब्ध माहिती, आरोपींशी असलेला संपर्क आणि हत्याकांडातील संभाव्य भूमिका याबाबत पुणे ग्रामीण पोलीस सखोल चौकशी करत आहेत.