पुण्यातील कात्रज-कोंढवा रोड ठरतोय जीवघेणा, रस्त्यावर पुन्हा अपघात; ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातांचे सत्र कायम सुरु असून अवजड ट्रकच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना रविवारी (ता.१३) रात्री घडली आहे.
प्रभावती पांडुरंग अनभुले (वय ७०, रा. विघ्नहर्तानगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, अनभुले रविवारी रात्री दहाच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघाल्या होत्या. त्यावेळी भरधाव ट्रकने (कंटेनर) पादचारी अनभुले यांना धडक दिली.
ट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरू आहे. ५ ऑगस्ट रोजी भरधाव ट्रकने ११ वाहनांना धडक दिली. अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता.
ट्रकने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला धडक दिली. सुदैवाने शाळकरी मुलांना दुखापत झाली नाही. दरम्यान, अपघाताच्या घटनांमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत.