जुन्नर हादरलं! लग्न न लावल्याचा राग जीवावर बेतला; संताप उफाळून मुलाने बाप-भावाचा रक्तरंजित शेवट..


जुन्नर : जुन्नर तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या वडिलांची आणि लहान भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे ओतूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव मढ तर्फे येथील बगाडवाडी परिसरात घडली. जयराम महादू मुकणे (वय 60) आणि राजेंद्र जयराम मुकणे (वय 27) अशी मृतांची नावे आहेत. तर बाबजी जयराम मुकणे (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबात गेल्या काही काळापासून शेतजमिनीच्या वाटणीवरून आणि आर्थिक व्यवहारांवरून तीव्र वाद सुरू होता. हा वाद गुरुवारी टोकाला गेला आणि आरोपीने संतापाच्या भरात घरातील जड दगडाने वडील आणि भावावर हल्ला केला. डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर वार झाल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

तसेच आरोपीच्या लग्नाच्या मुद्द्यावरूनही कुटुंबात मतभेद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच दीर्घकाळ चाललेल्या वादातून ही भीषण घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ओतूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे जुन्नर परिसरात शोककळा आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!