मुंबई महापालिकेत नोकरीची संधी! पगार किती, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज…

मुंबई : नोकरीच्या शोधत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर’ या पदासाठी अर्ज मागवण्यात आले असून एकूण २९ रिक्त जागांवर ही भरती होणार आहे. ही संधी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार २५ जून २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.

तसेच या भरतीद्वारे मुंबई महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सामाजिक विकासाशी संबंधित कामांमध्ये उमेदवारांना प्रत्यक्ष योगदान देता येणार आहे. विशेष म्हणजे ही नोकरी मुंबई शहरातच असून, स्थानिक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.
दरम्यान, या पदासाठी ठरवण्यात आलेले मासिक वेतन ३०,००० रुपये इतके आहे. उमेदवाराची वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल ४३ वर्षे असावी लागते. शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचं झालं, तर उमेदवार पदवीधर असावा लागतो.

समाजशास्त्र, नागरी प्रशासन, शहरी विकास किंवा कम्युनिटी वर्क या विषयात पदवी किंवा डिप्लोमा असलेल्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, ज्या उमेदवारांना सामाजिक प्रकल्पांमध्ये किंवा स्थानिक समुदायांसोबत काम करण्याचा अनुभव आहे, त्यांना या पदासाठी विशेष संधी उपलब्ध होणार आहे. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे.
या पदासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया नसून, उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची छायांकित प्रती जोडावी लागेल. अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावा लागणार आहे:
उपमुख्य अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) कार्यकारी कार्यालय,
मुंबई महानगरपालिका इमारत,
६ वा मजला, पंतनगर बेस्ट डेपोच्या मागे,
पंतनगर महानगरपालिका यानगृह, घाटकोपर (पूर्व),
मुंबई – ४०००७५
दरम्यान, सदर अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख २५ जून २०२५ आहे. अर्ज स्वीकारल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाईल. मुलाखतीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येईल.