सुजय विखेंच्या अध्यक्षपदावर टांगती तलवार? सहकार न्यायालयाची नोटीस; अहिल्यानगर जिल्हा बँकेत मोठा ट्विस्ट


अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या निवडीला सहकार न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, न्यायालयाने सुजय विखे यांच्यासह जिल्हा बँक आणि निवडणूक प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणात 16 नोव्हेंबर रोजी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

गुरुवारी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये सहकार पॅनेलकडून माजी खासदार सुजय विखे पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. मात्र, त्यांच्या निवडीवर आता कायदेशीर आक्षेप घेण्यात आला आहे.

सुजय विखे हे राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक असताना कारखान्याचे जिल्हा बँकेकडील कर्ज थकीत झाले होते. त्यामुळे सुजय विखे हे जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्याचा दावा एकनाथ घोगरे यांनी केला आहे. थकबाकीदार असल्याने ते संचालकपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र ठरतात, असा आक्षेप घेत घोगरे यांनी सहकार न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेची दखल घेत न्यायालयाने सुजय विखे यांच्यासह संबंधितांना नोटीस बजावली असून, 16 नोव्हेंबर रोजी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.

वकिलांनी नेमकं काय सांगितलं?

याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील सुरेश लगड यांनी या प्रकरणाची माहिती दिली. सुजय विखे यांनी संचालकपदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, ते राहुरी येथील कारखान्याचे संचालक असताना कारखान्याचे जिल्हा बँकेचे कर्ज थकीत असल्याने त्यांना थकबाकीदार ठरवण्यात यावे, अशी हरकत घेण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

यासंदर्भातील सर्व कागदपत्रे आणि आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले होते. मात्र, त्यावर योग्य विचार झाला नसल्याचा आरोप लगड यांनी केला. त्यानंतर या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्यात आली. तेथून सहकारी न्यायालयात जाण्याचा सल्ला मिळाल्यानंतर अहिल्यानगरच्या सहकार न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

16 नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लक्ष

सुजय विखे यांचा निवडणूक अर्ज मंजूर करण्याच्या निर्णयाला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून 16 नोव्हेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

त्यामुळे सुजय विखे यांच्या निवडीवर उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांवर न्यायालयात काय भूमिका मांडली जाते आणि पुढे काय निर्णय होतो, याकडे अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र, न्यायालयाने अद्याप त्यांच्या निवडीबाबत अंतिम निर्णय दिलेला नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!