कमी वीज वापरूनही वाढीव बिल? महावितरणच्या नव्या निर्णयाने नागरिक चिंतेत..


नवी दिल्ली : देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना आता वीज बिलाबाबतही मोठी चिंता समोर आली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरण कडून वीज बिलातील फिक्स्ड चार्ज वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, हा प्रस्ताव लागू झाल्यास कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

सध्या वीज बिलात वापरलेल्या युनिटनुसार आकारले जाणारे शुल्क आणि दर महिन्याला आकारला जाणारा फिक्स्ड चार्ज असे दोन भाग असतात. ग्राहकाने वीज कमी वापरली किंवा घर काही दिवस बंद असले तरी फिक्स्ड चार्ज भरावा लागतो. आता हा निश्चित शुल्काचा हिस्सा आणखी वाढवण्याची तयारी सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

प्रस्तावित बदलांनुसार भविष्यात वीज बिलातील मोठा हिस्सा फिक्स्ड चार्जच्या स्वरूपात असू शकतो. त्यामुळे घरात अत्यल्प वीज वापर झाला किंवा कुटुंब बाहेरगावी गेले तरी ग्राहकांना ठराविक रक्कम भरावी लागू शकते. “वापर नसतानाही बिल” अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, घरगुती आणि कृषी ग्राहकांसाठी फिक्स्ड चार्जचा हिस्सा एकूण वीज खर्चाच्या सुमारे 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. तर उद्योग, मॉल्स आणि मोठ्या व्यावसायिक ग्राहकांसाठी 2030 पर्यंत हा हिस्सा 100 टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

वीज वितरण कंपन्यांच्या मते, ट्रान्समिशन लाईन्स, सबस्टेशन, देखभाल, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि संपूर्ण वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. सध्याच्या फिक्स्ड चार्जमधून हा खर्च पूर्णपणे वसूल होत नसल्याने कंपन्या वाढीची मागणी करत आहेत.

दरम्यान, देशात रूफटॉप सोलर प्रकल्पांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक ग्राहक स्वतः वीज निर्मिती करू लागल्याने वितरण कंपन्यांचे उत्पन्न घटत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचा खर्च भागवण्यासाठी फिक्स्ड चार्ज वाढवण्याचा पर्याय विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!