शिंदे गटाला मोठा झटका! दोन बड्या नेत्यांना आयकर विभागाची नोटीस, नेमकं कारण काय?

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

शिरसाट यांच्यावर मालमत्तेत झालेल्या वाढीबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे, तर श्रीकांत शिंदेंनाही तपासाच्या चौकटीत घेतले आहे. या कारवाईमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, ही पावले राजकीय दबावाखाली उचलली जात आहेत का? यावरून उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान, यासंदर्भात शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली असून, नोटीस म्हणजे कारवाई नव्हे, आम्ही कायदेशीररित्या उत्तर देणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की, २०१९ ते२०२४ दरम्यान मालमत्तेत झालेल्या वाढीबाबत आयकर विभागाने स्पष्टीकरण मागवले आहे. काही लोकांनी आमच्या विरोधात तक्रार केली होती, त्याची दखल घेऊनच नोटीस पाठवण्यात आली आहे. आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही.
शिरसाट यांनी हेही सांगितले की, ९ जुलैपर्यंत उत्तर देण्याची मुदत होती, मात्र वेळ मागून घेतली आहे. आम्ही कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. एजन्सीने तपास केला तर आम्ही सहकार्य करू. यंत्रणेला शंका असेल तर त्यांच्याकडे चौकशी करण्याचा अधिकार आहे.
त्यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले, काही लोकांची पोटदुखी आहे. आम्ही त्या प्रत्येक टीकेला समर्थपणे उत्तर देऊ. माझ्यावर कुठलाही दबाव नाही. मी कोणाच्याही रडारवर नाही. त्यामुळे या गोष्टींना फारसे गांभीर्याने घेण्याचे कारण नाही.
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, श्रीकांत शिंदेंनाही नोटीस आली आहे, मात्र आयकर विभाग प्रत्येकाची चौकशी करत असतो. ही प्रक्रिया सामान्य आहे. कोणत्याही नोटिशीला सामोरे जाणे हेच योग्य.
त्यांनी इशारा दिला की, या कारवाईचा राजकीय अर्थ लावणे चुकीचे आहे. ही तपास प्रक्रिया आहे. आम्ही आमचे सर्व विवरण आधीच शपथपत्राद्वारे निवडणुकीत सादर केले आहे. जर त्यात काही स्पष्टता हवी असेल तर आम्ही ती देण्यासाठी तयार आहोत. असे ते म्हणाले आहे.