दौंड तालुका तहसिलदार यांच्या उपस्थितीत हत्याकांड कुटुंबातील सात पैकी ३ मृतदेहांचे पुन्हा शवविच्छेदन…!

दौंड : अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या दौंडमधील हत्याकांड प्रकरणातील सातपैकी तीन मृतदेहांचे तालुका दंडाधिकारी संजय पाटील यांच्या उपस्थितीत ससून वैद्यकीय टीमकडून शवविच्छेदन करण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
यापूर्वी या तीन मृतदेहांचे स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पोलिसांनी शवविच्छेदन केले होते. या दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल त्यांच्याकडून देण्यात आला होता. मात्र पोलीस तपासात तीन चिमुकल्यांसह सात जणांची निघृपणे हत्या केल्याचे उघड झाले होते.
दरम्यान या वैद्यकीय अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आज पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली व दौंड तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संजय पाटील तसेच या गुन्ह्याचे तपासी अधिकारी व दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या उपस्थितीत पुणे येथील ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने हे दफन केलेले मृतदेह बाहेर काढून जागेवरच शवविच्छेदन केले.
पोलिसांनी यादरम्यान अतिशय गोपनियता बाळगलेली आहे. हा अहवाल नेमका काय आला याबाबत त्यांनी अधिकृत माहिती देण्याचे टाळले आहे. त्यामुळे या मृतदेहांचा सुरुवातीस स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनाचा अहवाल व आता पुन्हा एकदा करण्यात आलेले शवविच्छेदन च्या अहवालात काय तफावत निघते हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान पुन्हा करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबून मारणे, शरीरावर जखमा असणे असा अहवाल प्राप्त झाल्यास स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा जो शवविच्छेदन अहवाल दिला, त्या शवविच्छेदन अहवाल दिल्याप्रकरणी कारवाई होणार का ? याकडे लक्ष लागले आहे.