वाल्मिक कराडाचा आणखी एक कारणामा! अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांना कोट्यवधींचा घातला गंडा?

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने सर्व राज्य ढवळून निघाले आहे. या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला नाही. वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.अशातच आता वाल्मिक कराड याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.
तसेच वाल्मिक कराडने राज्यातील १४० शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कृषीमंत्री माझ्या जवळचे आहे, तुम्हाला अनुदान मिळवून देतो, असे सांगत वाल्मीक कराड याने १४० शेतकऱ्यांकडून पैसे घेतले. या सर्वांना ११ कोटी २० लाख रुपयांचा गंडा वाल्मिक कराड याने घातल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पैसे परत मागितल्यावर मारहाण करून हाकलून दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर आता त्याचा हा प्रताप समोर आला आहे. सोलापूरसह राज्यातील १४० ऊस तोडणी यंत्र मालकांना ११ कोटी २० लाख रूपयांचा गंडा वाल्मिक कराड याने घातल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे.
दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनच्याद्वारे ऊस तोडणीचे काम करतात. या मशिनला प्रत्येकी ३६ लाखाचे अनुदान देतो, असे सांगून वाल्मिक कराड याने या मशीन मालकांना प्रत्येकी आठ लाख रुपये देण्याचे सांगितले होते. तत्कालीन कृषीमंत्री हे माझे जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळवून देतो, तुम्ही फक्त रोख रक्कम घेऊन माझ्याकडे या, असे कराड यांनी सांगितल्याचे दिलीप नागणे यांनी सांगितले आहे.