पुणे जिल्ह्यात भाजपला बदलत्या सत्ता समिकरणाने ग्रहण! राष्ट्रवादी गटाचे जिल्ह्यात डॅमेज कंट्रोल…!!
जयदीप जाधव
उरुळीकांचन : राज्यातील बदलत्या सत्ता समिकरणाचा परिणाम पुणे शहराप्रमाणे जिल्ह्याच्या प्रशासनावर होऊ लागला आहे. जिल्ह्याचे मुख्य प्रशासन असलेल्या पुणे ग्रामीण पोलिस, पुणे जिल्हा परिषद ,जिल्हाधिकारी तथा तालुका महसूल कचेऱ्यांत आता राष्ट्रवादी गटाकडून आता थेट हस्तक्षेप वाढल्याने जिल्ह्यातील मोजकीच ताकद असलेल्या भाजपला आता आपल्याच सत्तेच्या पॅटर्नमुळे तोंड दाबून बुक्कांचा मारा करावा लागत आहे.
जिल्ह्यातील सत्ता केंद्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे आता कार्यरत होऊ लागले असल्याने भाजप लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांचे सत्ता समिकरणांतील अधिपत्य आता उतरणीला लागल्याने राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या पक्षाची पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अस्तित्वाची शकले निघू लागली आहे.
राज्यातील सत्ता समिकरणांची घडी बसविताना भाजपने राष्ट्रवादीतील अजित पवार गटाला सत्तेत सहभागी करुन घेतले आहे. सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीला जिल्ह्यात पालकमंत्री पद मिळविण्यापूर्वीच जिल्हा प्रशासनाची सूत्रे सांभाळण्यासाठी सुरुवात झाली आहे.या सुरुवातीचा भाग म्हणून जिल्हा प्रशासनात राष्ट्रवादीला वाढलेले झुकते माप व भाजपच्या मंडळींना झाकते माप हे बदलत्या सत्ता समिकरणातील वस्तुपाठ आता पुढे येत आहे.
पुणे शहरातील मनपा,पुणे पोलिस आयुक्तालय बैठकांपाठो पाठ आताग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या पुणे ग्रामीण पोलिस ,पुणे जिल्हा परिषद ,पीएमआरडीए, कृषी व सहकार कार्यालये राष्ट्रवादीच्या हस्तक्षेपात कामकाज करीत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राबता वाढू लागला आहे.
पुणे जिल्ह्यात सत्ता समिकरणे बदलल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात बारामती तालुक्यात प्रवेश करतानाच तालुक्यातील सुपे या नव्या पोलिस ठाण्याची निर्मितीचा निर्णय अगदी दोन दिवसांत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाने घेतला आहे. याऊलटची परिस्थिती म्हणून पोलिस ठाण्याची मुख्य गरज असलेल्या हवेली तालुक्यातील उरुळीकांचन पोलिस ठाणे व दौंड उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी मात्र अडीच वर्षे उलटून पूर्ण होऊ शकली नाही.
अशीच परिस्थिती जिल्ह्यात सहकारी तत्वावर असलेल्या एका कारखान्याबाबत राष्ट्रवादी ने बैठक घेऊन पूर्ण केली आहे. ग्रामीण भागातील शासन आपल्या दारी उपक्रमानंतर जिल्ह्यातील सत्ताकेंद्रातील सत्तेच्या कवचाकडे भाजपने फारसे गांभीर्याने न पाहिल्याने भाजपच्या पत्रांना आता जिल्हा प्रशासनाला फारसे गांभीर्याने घेत नसल्याने भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
विधानसभा निवडणुकीचे गणित बिघडणार!
पुणे जिल्ह्यात भाजपचे शहरातील अस्तित्व वगळता ग्रामीण भागात जनसंघाच्या अस्तित्वापासून प्राबल्य असलेले मावळ, शिरूर हे दोन मुख्य मतदारसंघ आहेत. परंतु गत निवडणुकीत या पक्षाने मोठ्या फरकाने येथे जागा गमावल्या आहेत. तर इंदापूर व दौंड मध्ये मुख्य गट हे भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे भाजपचे अस्तित्व गटांवर अवलंबून आहे.
मात्र पूर्वीपासून भाजपला साथ देणाऱ्या शिरुर व मावळ मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आदरातिथ्य पुरतेही विश्वासात घेतले नसल्याने भाजपची आवस्था बदलत्या सत्ता समिकरणात खिळखिळी होणार आहे.