पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या खाजगी हॉस्पिटल्स बंद; 10 हजार डॉक्टरांचा सामूहिक संप, काय आहे कारण?

पुणे : सोमवारी (20 जुलै) तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी दवाखान्यात जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. डोंबिवलीतील शांतिनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्यातील सुमारे 10 हजार खाजगी डॉक्टरांनी 24 तासांच्या सामूहिक संपाची हाक दिली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया (पुणे शाखा) यांच्या आवाहनानुसार हा संप 20 जुलै रोजी सकाळी 6 ते 21 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात खाजगी रुग्णालयांमधील OPD आणि नियमित तपासण्या बंद राहतील. मात्र, अतितातडीच्या आणि आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या
डॉक्टर संघटनांनी सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत:
डोंबिवली हल्ल्यातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई.
‘महाराष्ट्र मेडिकेअर कायदा’ अधिक कडक आणि प्रभावी करावा.
सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण लागू करावे.
डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करण्याची हमी द्यावी.

डॉक्टरांच्या या राज्यव्यापी संपामुळे पुण्यातील आरोग्य सेवा काही प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता असून, नागरिकांनी नियमित तपासण्या आणि OPD संदर्भातील कामांचे नियोजन आधीच करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
