लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! योजनेला आणखी एक चाळणी, ‘या’ महिलांचा लाभ थांबणार…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारसाठी एक महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला आता आणखी एक चाळणी बसणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अपात्र महिलांकडूनही या योजनेचा लाभ घेतला जात असल्याची माहिती उघड झाल्यानंतर, गेल्या सहा महिन्यांपासून ‘लाडकी बहीण’ योजनेची विविध पातळीवर छाननी केली जात आहे. आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या डेटाचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे अनेक अपात्र महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही.
दरम्यान प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाभार्थी महिलांसंबंधित माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार, महिलांच्या इन्कम टॅक्स रिटर्न डेटाचा वापर करून त्यांची पात्रता तपासली जाईल. त्यामुळे, इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांची एक यादी तयार करून, त्यांना योजनेतून मिळणारा लाभ बंद करण्यात येणार आहे.
ही योजना सुरू केली तेव्हा राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी काही पात्रता निकष निश्चित केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने, अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे, अशी अट घातली होती. मात्र, प्रत्यक्षात २.५ लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनीही ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज केल्याचे आणि लाभ घेतल्याचे समोर आले आहे.