महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व धर्मदाय रुग्णालयांत लागू करा; आमदार राहुल कुल यांची लक्षवेधी

उरुळीकांचन : पावसाळी अधिवेशन २०२५ दरम्यान आमदार राहुल कुल यांनी विधानसभा सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत लक्षवेधी चर्चा उपस्थित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार कुल म्हणाले कि, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये लागू करणे बंधनकारक करणे आवश्यक आहे.
योजनेतील उपचारांचे दर वाढविण्यात यावेत,धर्मादाय रुग्णालये व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांचे दर तसेच धर्मादाय रुग्णालयातील उपचाराचे महत्तम दर शासनाने ठरवावेत आणि त्यामध्ये हस्तक्षेप करावा, धर्मादाय योजनेत उपचार करत असताना औषधांचा समावेश करण्यात यावा, अनेक रुग्णालये शासकीय योजनेचा लाभ घेतात, परंतु रुग्णांना मदत दिली जात नाही.
अशा रुग्णालयांबाबत निर्णय घेऊन त्यांना योजनेत समाविष्ट करावे व लाभ न दिल्यास ती रक्कम वसूल करण्यात यावी, रुग्ण सेवक नेमणुकीचा निर्णय घेण्यात आला असून, कार्यरत असलेल्या सोशल वर्करनी त्वरित मदत देण्याचे आदेश निर्गमित करावेत अशा विविध मागण्या आमदार राहुल कुल यांनी यावेळी केल्या.
या मागण्यांना उत्तर देताना राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सांगितले की, मागील अधिवेशनात विधेयक पारित करण्यात आले असून, त्याअंतर्गत ३३० नवीन रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. काही रुग्णालये अद्याप राहिली असल्यास त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना देखील योजनेत समाविष्ट केले जाईल. योजनेतील उपचारांचे दर ठरविण्याबाबत आरोग्य विभागाला आदेश देण्यात येतील. औषधांचे दर समाविष्ट करण्याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.