दौंडमध्ये कायद्याला चकवा देत सुरू होता काळा कारभार; 35 हजारांत गर्भलिंग तपासणी, 2 वर्षांत 500 गर्भपातांचा संशय

दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नुकतेच बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि भ्रूणहत्या प्रकरणातील मोठे रॅकेट उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गेल्या दोन वर्षांत तब्बल 500 गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून आणखी काही संशयितांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील केडगाव परिसरातील एका घरात गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात होती. यासाठी पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गर्भलिंग तपासणीसाठी संबंधितांकडून 35 ते 50 हजार रुपये आकारले जात होते. या बेकायदेशीर कामातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात पोलिसांनी बनावट डॉक्टर अण्णासाहेब गिरी याला 20 मे रोजी केडगाव येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर 24 मे रोजी वाघोली येथून डॉक्टर जाधव यालाही अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये दलाल, काही डॉक्टर तसेच मध्यस्थांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे एक संघटित आणि मोठे जाळे असल्याचा संशय असून तपास यंत्रणा त्यादृष्टीने चौकशी करत आहे.