“शिवसेनेचा बाप मीच!”, भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, शिवसैनिक आक्रमक..


भंडारा : भंडारामधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजप नेते परिणय फुके यांनी भाषण केले. यावेळी मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेचा बाप मीच असे भाजप नेते परिणय फुके म्हणाले आहेत. यामुळे महायुतीमध्ये मीठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटाने तातडीने आक्रमक भूमिका घेतली असून, माफीची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.

फुके म्हणाले, शिवसेनेचा बाप मीच आहे, कारण सगळं खापर माझ्यावर फोडलं जातं. जसं काही चांगलं झालं तर आईने केलं म्हणतात आणि काही वाईट झालं की बापावर फोडतात, तसंच हे झालं आहे.

त्यामुळे आपण टीकांकडे दुर्लक्ष करून पक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तसेच त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानत विधान परिषदेमध्ये दुसरी संधी दिल्याचंही स्पष्ट केलं.

परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात फुके यांनी माफी मागावी, अन्यथा “शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

मात्र दुसरीकडे, शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संयम राखत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ही व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया आहे, पक्षाची अधिकृत भूमिका नाही. युतीचं सरकार आहे आणि आपण जनतेच्या सेवेसाठी काम करत आहोत, त्यामुळे वाद न वाढवता कामाची प्रसिद्धी द्या..

दरम्यान, या वादग्रस्त विधानामुळे आता राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि भाजप युती सरकारमध्ये आतून कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण येण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!