पार्थ पवारांना 10 कोटींचं कर्ज, दुबईत फ्लॅट अन् आलिशान बोटींची मालकी; विधान परिषदेच्या रिंगणातील विक्रम काकडे किती श्रीमंत?

पुणे : पुणे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विक्रम काकडे यांची राजकीय ताकद जितकी चर्चेत आहे, तितकीच चर्चा आता त्यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीचीही रंगू लागली आहे. पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या विक्रम काकडे यांनी पार्थ पवारांना तब्बल 10 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचबरोबर आलिशान बोटी, लक्झरी कार, महागडी घड्याळे आणि दुबईतील फ्लॅटमुळेही त्यांची संपत्ती चर्चेचा विषय ठरली आहे.

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, विक्रम काकडे यांच्याकडे सुमारे 150 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे. यामध्ये जवळपास 79 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता समाविष्ट आहे. रोख रक्कम, बँक ठेवी, सोने-चांदी, लक्झरी घड्याळे, महागड्या गाड्या आणि बोटी यांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच दुबईमध्येही त्यांची सदनिका असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.
विक्रम काकडे यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून नाही तर मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणूनही आहे. माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र असलेले विक्रम काकडे गेल्या काही वर्षांत पुण्याच्या राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रभावी चेहरा म्हणून उदयास आले आहेत. पुणे विधान परिषदेसाठी त्यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या आर्थिक सामर्थ्याची चर्चा सुरू झाली.

प्रतिज्ञापत्रातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी दिलेली कोट्यवधींची कर्जे. पार्थ पवारांना 10 कोटी रुपयांचे कर्ज देण्याबरोबरच विविध व्यावसायिक आणि बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांना देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्याची नोंद आहे. त्यामुळे राजकारणासोबतच आर्थिक क्षेत्रातही त्यांचे मजबूत नेटवर्क असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, विक्रम काकडे यांना पुणे विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षांतर्गत नाराजीचाही सूर उमटला आहे. काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले, तरी पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांची आर्थिक-संघटनात्मक ताकद यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
18 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत विक्रम काकडे यांचे राजकीय भवितव्य ठरणार असले, तरी सध्या मात्र “पार्थ पवारांना 10 कोटींचे कर्ज देणारे आणि 150 कोटींच्या संपत्तीचे मालक” अशीच त्यांची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.