गुजरातमध्ये भीषण घटना!! पुलाचे झाले अचानक दोन तुकडे, अनेक वाहने नदीमध्ये, तिघांचा मृत्यू, टॅंकरही लटकला..

गुजरातमध्ये वडोदराच्या पाड्रा आणि आनंद जिल्ह्यांना जोडणारा महिसागर नदीवर बांधलेला ४५ वर्षे जुना पूल आज सकाळी कोसळला. या दुर्घटनेत पुलावरून जाणारे दोन ट्रक, एक बोलेरो आणि एक जीपसह चार वाहने नदीत कोसळली. यामुळे एकच खळबळ उडाली. ही एक भीषण घटना आहे. सध्या याठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर लगेचच १०८ रुग्णवाहिकांना याची माहिती देण्यात आली. प्रशासनाचे पथक घटनास्थळी उपस्थित आहे आणि नदीत कोसळलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या पुलावर अजून एक ट्र्क अडकला आहे. तो खाली लटकत आहे. यामुळे कोणत्याही क्षणी तो खाली पडू शकतो. सकाळी शाळेची वाहनं, इतर वाहनांची ये-जा सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिक सांगत आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलीस, प्रशासनाने लागलीच धाव घेतली. पूल कोसळल्यामुळे अजूनही एक टँकर पुलावर लटकत आहे.आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात आले आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा मुजपूरसह जवळपासच्या गावांतील लोकांची गर्दी घटनास्थळी जमली होती. याठिकाणी सध्या प्रशासनाकडून मदत कार्य सुरु आहे. यामुळे अजूनही मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुजपूर गावातील लोकांना हा पूल कोसळल्याची माहिती मिळताच लोक मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यासोबतच पाड्रा पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केली. या पुलाला पाड्रा-गंभीरा पूल असेही म्हणतात. सकाळी जवळपास 7:30 ही घटना घडल्याचे समजते.
पूल कोसळल्यानंतर या भागात भीतीचे वातावरण तयार झाले. या मार्गावर वाहनांचा खोळंबा झाला. वाहनांची गर्दी वाढू लागल्याने पर्यायी मार्गाकडे वाहतूक वळवण्यात आली. गोताखोरांना बोलावून नदीत शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये अनेक अधिकारी कामाला लागले आहेत.