पुण्यात भीषण अपघात ; टेम्पो- दुचाकी धडकेत एक ठार,टेम्पो चालक ताब्यात…

पुणे : अपघातांचा हॉटस्पॉट असलेल्या पुण्यातील कात्रज चौकात भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक बसून जोरदार अपघात झाला आहे. या अपघातात डोक्याला मार लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. या अपघातप्रकरणी पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन टेम्पोचालकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महंमद इक्बाल परवेज पठाण (वय २६) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.तो दुचाकीवरून जात असताना, भरगुडे भरधाव टेम्पो घेऊन चौकात आला. त्याने महंमदच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात महमंद रस्त्यावर पडला; तसेच त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ सातारा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
या प्रकरणी नाहिदा अंजुम परवेज पठाण (रा. राजस सोसायटी, कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अमोल वसंत भरगुडे (रा. आंबेगाव खुर्द) याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कात्रज चौक अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज सकाळी, सायंकाळी येथे वाहतुकीची कोंडी होते. निष्काळजी वाहनचालकांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे.