पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेला धावणार हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा…

पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्ग आता प्रत्यक्ष सेवेत येण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निर्णायक मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाबाबत राज्य सरकारने स्पष्ट वेळापत्रक निश्चित केले असून पहिल्या टप्प्यातील स्थानके सुरू करण्यासाठी कामाला गती देण्यात आली आहे.

मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पातील विलंबाबाबत नाराजी व्यक्त करत 30 जूनपर्यंत पहिला टप्पा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
PMRDA चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या माहितीनुसार काही तांत्रिक व प्रशासकीय कामे अद्याप बाकी असून, त्यामुळे प्रवासी सेवा 15 जुलैपर्यंत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 12 स्थानके नागरिकांसाठी खुली केली जाणार असून आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

एकूण 23.2 किलोमीटर लांबीचा हा उन्नत मेट्रो मार्ग 23 स्थानकांसह विकसित केला जात आहे. पहिल्या टप्प्यानंतर उर्वरित स्थानकेही लवकरच पूर्ण करून पुढील दीड ते दोन महिन्यांत संपूर्ण मार्गिका प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा दावा आहे.

हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उभारला जात असून देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच मेट्रो प्रकल्प मानला जातो. टाटा समूहाची TRIL आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स यांच्या संयुक्त सहभागातून हा प्रकल्प साकारत आहे. सुमारे 8,313 कोटी रुपयांच्या खर्चाचा हा प्रकल्प पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाईचे संकेतही दिले आहेत.