पहिलीच्या अभ्यासक्रमातून हिंदी विषय हटवला, सुधारित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या..

पुणे : राज्य सरकारने शालेय शिक्षणाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हिंदी भाषा सक्तीला प्रचंड विरोध झाल्यानंतर पहिलीच्या अभ्यासक्रमातून हिंदी विषय वगळण्यात आला आहे.
नवीन वेळापत्रकात हिंदी विषय पूर्णपणे वगळण्यात आला असून, मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा आता अनिवार्य असतील. एससीईआरटीने यासंदर्भातील सुधारित वेळापत्रकही जाहीर केलं आहे.
तसेच राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला राज्यभरातून प्रचंड विरोध झाला. अनेक शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी या हिंदी सक्तीविरोधात आवाज उठवला. राज ठाकरे यांनीदेखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली होती.
दरम्यान, सर्व बाजूंनी होणाऱ्या विरोधाचा विचार करून सरकारने अखेर निर्णय मागे घेतला असून, पहिलीच्या अभ्यासक्रमातून हिंदी हटवण्यात आला आहे. एससीईआरटीने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, आता मराठी व इंग्रजी या दोनच भाषा सक्तीच्या असणार आहेत.
हिंदी हटवल्यामुळे मिळालेला वेळ आता कला, क्रीडा, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी वापरण्यात येणार आहे. या विषयांसाठीच्या तासिकांचा कालावधी पूर्ववत करत त्यात साप्ताहिक वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकूणच सर्वांगीण विकासासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
एससीईआरटीने सर्व शाळांना तातडीने सुधारित वेळापत्रकानुसार विषयानिहाय तासिका विभागणी करून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाचा विचार करून विविध उपयुक्त उपक्रम राबवावेत, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.