IAS कोचिंग संचालिकेचे 1.89 कोटींचे हाय-प्रोफाइल अपहरण! माजी विद्यार्थीच मास्टरमाइंड, भोपाळ पोलिसांची मोठी कारवाई

दिल्ली: राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध IAS कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका शुभ्रा रंजन यांना भोपाळमध्ये बळजबरीने डांबून ठेवून 1.89 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोपाळ गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) तात्काळ तपास करत या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला असून मास्टरमाइंडसह सहा आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी प्रियंक शर्मा याने सेमिनार आणि नवीन कोचिंग सेंटर विस्ताराच्या नावाखाली शुभ्रा रंजन यांना भोपाळमध्ये बोलावले होते. त्या शहरात आल्यानंतर त्यांना आधी पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आणि नंतर बागसेवनिया परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये नेण्यात आले. येथे आरोपींनी पिस्तुल आणि देशी कट्ट्याचा धाक दाखवत त्यांना दोन दिवस डांबून ठेवले.
या काळात धमकावत ‘जनकशिला’ आणि ‘आरएस एंटरप्रायजेस’शी संबंधित बँक खात्यांमध्ये तब्बल 1.89 कोटी रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे तात्काळ कारवाई करत संबंधित बँक खाती गोठवली असून संपूर्ण रक्कम सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.

तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, हा संपूर्ण कट मुख्य आरोपी प्रियंक शर्मा याने आखला होता आणि तो पीडित महिलेचाच माजी विद्यार्थी आहे. त्याला संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची पूर्ण माहिती होती. अटक टाळण्यासाठी त्याने आजारी असल्याचे नाटक करत एम्स भोपाळच्या आयसीयूमध्ये भरती होण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला तिथूनच ताब्यात घेतले.

आरोपींनी अपहरणाचा बनावट व्हिडिओ तयार करणे, खोलीत धार्मिक कार्यक्रमाचा आडोसा तयार करणे आणि बाहेर संशय येऊ नये म्हणून काटेकोर नियोजन केल्याचेही समोर आले आहे. या गुन्ह्यात बाहेरील राज्यांतील गुन्हेगारांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून ही आंतरराज्यीय टोळी असल्याचा संशय आहे.
सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली आहे.