‘डोक्याचा ताप’… टक्कल व्हायरसमुळे लग्नच जुळेना, मुलींचा लग्नाला चक्क नकार, बुलढाण्यातील गावकरांच्या अडचणीत वाढ

बुलढाणा : बुलढाण्यातील शेगाव मधील काही गावांमध्ये केसगळतीचे प्रमाण वाढले असून, लोक अचानक टकले व्हायला लागले आहेत. या विचित्र प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे दिल्लीवरून डॉक्टरांचं पथक आले तरी हा प्रकार कशाने होतोय हे त्यांनाही अजून कळलेलं नाही. त्यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. या प्रकारातून दिलासा मिळेल की नाही याची भीती त्यांना वाटू लागली आहे.
सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही केस गळतीचे प्रमाण वाढलं आहे. हे सुरू असतानाच आता या गावकऱ्यांसमोर आणखी एक नवं संकट उभं राहिलं आहे. ते म्हणजे या गावातील तरुणांना कुणीही मुली द्यायला तयार नाहीत. त्यांचं लग्नच जुळत नसल्याने गावकरी चांगलेच वैतागले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात आलेल्या केस गळतीच्या आजाराने अनेकांना हैरान केल आहे. ज्या गावात केस गळतीच्या आजाराची रुग्ण सापडले त्या बोंडगावात कुणी लग्नासाठी मुलगीही द्यायला तयार नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
टक्कल व्हायरसच्या भीतीने या गावात सोयरीक जुळत नाहीये. ऐन लग्नसराईच्या मौसमात लग्नाला आलेल्या मुलांना कोणी मुली देत नाहीयेत तर मुलींना देखील लग्नासाठी मागणी येत नाहीयेत, त्यामुळे पालकांना मोठी चिंता सतावू लागली आहे.
आपल्याबलाही टक्कल व्हायरसची लागण होईल या भीतीने पालक मुलांना मुली देत नाहीये. तर बोंडगावातील मुलगी सून म्हणून आणली तर आपल्या घरात आणि गावात टक्कल व्हायरस पसरेल या भीतीने इतर गावातील लोक बोंडगावातील मुलींना मागणी घालत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.