राजीनामा द्यावाच लागेल!! रोहित पवारांकडून पुन्हा मंत्री कोकाटेंचे व्हिडिओ पोस्ट, रमी खेळताना स्पष्ट दिसतंय तरी राजीनामा का नाही?

मुंबई : काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. असे असताना अजून दोन व्हिडिओ त्यांनी शेअर केले आहेत.

रमी खेळताना स्पष्ट दिसतंय तरी राजीनामा का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आज याबाबत रोहित पवार म्हणाले, सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती.
पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे.

मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.
आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? असेही रोहित पवार म्हणाले.