‘तो पप्पी घेतो, माझ्या बेडशेजारी झोपतो…’; पुण्यातील शासकीय निवासी शाळेत उघड झाला धक्कादायक प्रकार


पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे येथील शासकीय निवासी शाळेत इयत्ता सहावीतील विद्यार्थ्याशी कथित गैरवर्तन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित सुरक्षा रक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

विद्यार्थ्याशी संवाद साधताना मोठा खुलासा…

मुख्याध्यापिका विमल खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने प्रवेश घेतलेला विद्यार्थी सुरुवातीच्या काही दिवस सतत रडत होता. २२ जून रोजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना संबंधित विद्यार्थ्याने आणि त्याच्या मित्राने सुरक्षा रक्षक आपली पप्पी घेतो आणि आपल्या कॉटला कॉट लावून झोपतो, अशी तक्रार केली होती.

त्यानंतर मुख्याध्यापिकांनी तत्काळ सुरक्षा रक्षकाच्या सुपरवायझरशी संपर्क साधून संबंधित कर्मचाऱ्याला कार्यालयात बोलावलं आणि अशा प्रकारचे वर्तन पुन्हा करू नये, अन्यथा नोकरीवरून काढून टाकले जाईल, अशी सक्त ताकीद दिली.

त्यानंतर २४ जून रोजी विद्यार्थी घरी गेला. पुढे १३ जुलै रोजी पोलिसांनी मुख्याध्यापिकांना पोलीस ठाण्यात बोलावले. त्यावेळी विद्यार्थ्याने सुरक्षा रक्षकाविरोधात अधिक गंभीर आरोप केल्याचे समोर आले. त्यानंतर विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली.

समाजकल्याण विभागाच्या निर्देशानंतर संबंधित सुरक्षा रक्षकाला सेवेतून कमी करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी शाळेत जाऊन पंचनामा केला असून फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली आहे. विद्यार्थी, पालक आणि इतर संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाने अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत. मुख्याध्यापकांसोबत दररोज एक शिक्षक निवासी राहणार असून शाळेत दोन सुरक्षा रक्षक कायम तैनात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!