हिंगणगाव- खामगाव टेक येथील जलसमाधी आंदोलन स्थगित ! सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आश्वासन !!

उरुळीकांचन: हवेली तालुक्यातील मुळा- मुठा नदी काठावरील हिंगणगाव – खामगाव टेक यादरम्यान नदीवर पूल उभारण्याची मागणी आता तीव्र स्वरुपात होऊ लागली आहे. लोकप्रतिनिधी व राज्यकर्ते नेहमीप्रमाणे पोकळ भूल थापा देत या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हिंगणगावच्या संतप्त नागरीकांनी सोमवार (दि.१) जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अश्वासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
हिंगणगाव व खामगाव टेक पुलासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाचा प्रयत्न पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अश्वासनानंतर पाठिमागे घेण्यात आला आहे. यावेळी आंदोलक अंकुश बापूराव कोतवाल यांनी नदीत उडी मारुन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. मुळा मुठा नदीवर हिंगणगाव -खामगाव टेक येथे पूल बांधण्यास पूर्व भागातील हिंगणगाव, मिरवडी, शिंदेवाडी,न्हावी सांडस, सांगवी सांडस या ग्रामस्थांना उरुळी कांचन मार्गे पुणे सोलापूर रस्त्यावर जोडणे अतिशय सोईस्कर होणार आहे. मात्र शासन कर्ते व लोकप्रतिनिधी या ग्रामस्थांना अश्वासने देऊन मागणी पूर्ण करत नसल्याने ग्रामस्थांनी जलसमाधी घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.
हिंगणगाव ते खामगाव टेक पुलासाठी तत्कालीन २०१४ रोजी तत्कालीन युती सरकारने अंदाजपत्रक काढून पूलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र या भागाचे लोकप्रतिनिधी या प्रश्नात लक्ष पुरवित नसल्याने पुलाची मागणी जैसे थे आहे. दरम्यान या आंदोलनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्य घेतले असून ग्रामस्थांना पूल बांधण्याचे अश्वासन दिल्यानंतर हे जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.