हवेली बाजार समितीसाठी पैशांच्या चुराड्याने चुरस वाढली : बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला …!
पुणे :हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सध्या चुरस निर्माण झाली असून आज याठिकाणी मतदान होत आहे. याठिकाणी १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तब्बल दोन दशकांनी निवडणूक होत असल्याने चुरस निर्माण झाली आहे़.
यामध्ये बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण १९५ अर्ज वैध ठरले होते. त्यामध्ये १३८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. निवडणुकीच्या रिंगणात सेवा सहकारी संस्था मतदार संघातून ११ जागांसाठी २९ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
ग्रामपंचायत मतदारसंघातून चार जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण गटातून दोन जागांसाठी सहा उमेदवार, अनुसूचित जाती जमाती गटातून एका जागेसाठी तीन उमेदवार, आर्थिक दुर्बल गटातून एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सर्वपक्षीय पॅनेल १५ जागांवर निवडणूक लढवित आहे. सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत गटांत राजकीय पक्षांच्या वतीने पॅनेलची घोषणा करण्यात आली आहे. तर, कोणत्याही पक्षाकडून त्यांच्या पॅनेलमध्ये आडते, व्यापारी गटात उमेदवार देण्यात आलेला नाही.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोर व भाजपने एकत्र येऊन आव्हान दिल्याने निवडणूक चुरशीची बनली आहे. खडकवासला व शिरुर-हवेली मतदारसंघाचे सर्वाधिक क्षेत्र या ठिकाणी असल्याने या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सेवा संस्था मतदारसंघासाठी १ लाख , ग्रामपंचायत मतदारसंघ २ लाख असा उच्चांकी दर मताला फुटल्याची चर्चा आहे.