Ghibli Trend च्या दुनियेत तुम्हीसुद्धा शेअर केले फोटो? आता तुमचे फोटो सुरक्षित आहेत का? वाचा भयावह पॉलिसीचे सत्य…

पुणे : सध्या सोशल मीडियावर ‘घिबली’ स्टाईल इमेजेसचा ट्रेंड जोरात सुरू आहे. ओपनएआयच्या लोकप्रिय चॅटबॉट चॅटजीपीटीवर या इमेजेस तयार करण्यासाठी वापरकर्त्यांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. फोटो इतके सुंदर असतात की आपणसुद्धा त्या ट्रेंडमध्ये सहभागी व्हावं, अशी आपसूकच इच्छा होते.
परंतु तुम्ही कधी विचार केला का, की तुम्ही अपलोड केलेले तुमचे प्रायव्हेट फोटो कुठे जातात? आज तुम्ही क्षणाचाही विचार न करता ट्रेंडमुळे तुमचे फोटो सर्रास त्या ॲपसोबत शेअर करत आहात. परंतु तुमचे खासगी फोटो या एआय प्लॅटफॉर्मवर सेव्ह केले जात आहेत आणि भविष्यात ते कसे वापरले जाऊ शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का?
दरम्यान, ChatGPT आणि Grok यांसारख्या प्लॅटफॉर्म्सद्वारे सुरू झालेल्या ट्रेंडमध्ये लोकांनी आपापले अनेक फोटो अपलोड केले आहेत. यात सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाहीत. सोशल मीडियावर असंख्य लोक घिबली स्टाइल फोटो अपलोड करत आहेत.
या ट्रेंडमध्ये फोटो शेअर करताना कोणीही डिजिटल प्रायव्हसीची काळजी घेत नाही. परंतु याचा विचार आता नेटकऱ्यांनी करायला हवा. कारण तुम्ही ज्या एआय टूल्सवर हे फोटो शेअर करत आहात, तो प्लॅटफॉर्म केवळ तुमचे फोटो साठवत नाहीये तर त्यांच्या प्रशिक्षणासाठीही त्यांचा वापर करत आहे.
AI ने या ट्रेंडला फक्त असुरक्षित असल्याचं म्हटलं नाही तर तुमचा खासगी डेटा तिथे साठवला जात असल्याबद्दलही सांगितलं आहे. जर तुम्ही तुमचे वैयक्तिक फोटो कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अपलोड करत असाल तर ते पूर्णपणे सुरक्षित मानले जाऊ शकत नाही.