हर्षवर्धन पाटिल यांच्या लेकिने वाढविले अजित पवारांचे टेन्शन! आमचं विधानसभेला काम करीत असाल तर तुमचा विचार करु…!!


पुणे : महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी आम्हाला तीन वेळी शब्द दिला होता, आणि तो नंतर फिरवला, आमची फसवणूक केल्याचा थेट आरोप इंदारपूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटलांनी दिला आहे. तुम्ही आमचं विधानसभेला काम केलं तरच आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू असंही त्या म्हणाल्या आहे.

तर काहीही झालं तरी आम्ही इंदापूरची विधानसभा लढवणारच असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांनी केल आहे. त्यामुळे बारामती लोकसभेच्या जागेवरून आता अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील गटामध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा उमेदवार जो असेल त्याचेच काम करावे लागेल असं अजित पवार सातत्याने म्हणत आले आहेत. आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच बारामती लोकसभेच्या उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र ज्यांच्या त्रासाला कंटाळून भाजपमध्ये गेले त्या हर्षवर्धन पाटलांची मात्र यामुळे गोची होत असल्याचं दिसून येतंय.

अजित पवारांनी शब्द देऊन तो फिरवला, फसवणूक केली
हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील म्हणाल्या की, या आधी आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो. त्यावेळी तीन वेळा आम्हाला शब्द देऊन तो फिरवण्यात आला, आमची फसवणूक करण्यात आली, आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आता आम्ही महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे विधानसभेला जे आमचे काम करतील त्यांनाच आम्ही लोकसभेला मदत करू.

इंदापूरची निवडणूक लढवणारच
गेल्या विधासभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता. हर्षवर्धन पाटलांच्या पराभवामागे अजित पवारांचा मोठा हात होता हे उघड झालं आहे. आता अजित पवार हे महायुतीत गेल्यानतंर इंदापूरच्या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. असं असलं तरीही २०२४ सालची विधानसभा आम्ही लढवणारच असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांनी केलं आहे.

बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी पूर्ण तयारी केली असून त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार याच उभ्या असतील हे जवळपास निश्चित झालं आहे. त्याचवेळी या लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून अंकिता पाटलांचे प्रयत्नही सुरू होते. पण अजित पवारांच्या महायुतीतील एन्ट्रीनंतर त्यांचं नाव आपोआप मागे पडलं. त्याचवेळी आता इंदापूरच्या जागेवरही अजित पवारांकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे.

त्याच पार्श्वभूमीवर अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून बारामतीतील राजकीय वातावरण मात्र तापण्याची चिन्हं असून पवार आणि पाटील गटामध्ये आणखी अंतर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!