Gunratn Sadavarte : मेहुण्याचे लाड आला अंगलट, जवळच्या लोकांचाच सदावर्तेंना धक्का, बँकेचे १४ संचालक संपर्क क्षेत्राच्या बाहेर…
Gunratn Sadavarte : एसटी कर्मचारी सहकारी बँकेचे १४ संचालक कालपासून नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळं गुणरत्न सदावर्ते यांना धक्का बसला आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे.
एसटी कर्मचारी बँकेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतील कार्यकर्त्यांना निवडून आणले, त्या संचालकांनीच सदावर्ते यांना मोठा धक्का दिला आहे. सदावर्ते यांच्या कार्यशैलीवर रोष व्यक्त करून १९ पैकी १४ संचालकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत.
गुणरत्न सदावर्ते आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून समाजात द्वेष पसरवत आहेत. सामान्य गरीब एसटी कर्मचाऱ्यांचा केवळ राजकारणासाठी उपयोग करत असल्याचा आरोप या चौदा संचालकांनी करत त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
गुरूवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीला १९ पैकी १४ संचालकांनी दांडी मारून सर्वजण संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले. संचालक मंडळाच्या बैठकीला केवळ पाच संचालक उपस्थित राहिले होते.
मेहुण्याचे लाड आला अंगलट..
एसटी कर्मचारी सहकारी बँकेत एकतर्फी सत्ता मिळवल्यानंतर सदावर्तेंनी त्यांचे मेहुण्याला व्यवस्थापकीय संचालकपदावर बसविले. बँकिंग क्षेत्रातील काडीचा अनुभव नसतानाही इतक्या मोठ्या पदावर त्यांना बसवल्यानंतर बँकेचे संचालकांमध्ये सदावर्तेंवर रोष होता. मेव्हण्याचे लाड त्यांना अंगलट आल्याचे बोले जात आहे.