४५ मिनिटं रेकी, अवघ्या २ फुटांवरून गोळीबार; पिस्तूल जाम झालं अन् टायगर श्रॉफचा जीव वाचला! नेमकं काय घडलं?


मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. हल्लेखोरांनी टायगरच्या कारवर एक-दोन नव्हे, तर तब्बल ७ गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका हल्लेखोराने अवघ्या दोन फुटांवरून टायगरला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी पिस्तूल जाम झाल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या घटनेनंतर आता हल्लेखोरांनी नेमका कसा कट रचला होता, याचा तपास सुरू आहे. हल्ल्यापूर्वी आरोपींनी तब्बल ४५ मिनिटे परिसरात रेकी केली होती. गोळीबारानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी वेगळीच शक्कल लढवली. आता हे आरोपी सुरतच्या दिशेने फरार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दोन फुटांवरून टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा प्रयत्न; पिस्तूल जाम झालं अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू कारवर गोळीबार केला. यातील दोघांनी कारवर गोळ्या झाडल्या, तर तिसरा आरोपी मोटरसायकलजवळ थांबून पळून जाण्याच्या तयारीत होता. हल्लेखोरांनी कारच्या पुढील विंडशील्ड आणि बाजूच्या खिडकीला लक्ष्य करत एकूण सात गोळ्या झाडल्या. त्यापैकी पाच गोळ्या कारला लागल्या, तर दोन गोळ्या अन्यत्र गेल्या.

विशेष म्हणजे, पाचवी गोळी झाडल्यानंतर एका हल्लेखोराने पॅसेंजर-साइडच्या खिडकीजवळ जाऊन टायगर श्रॉफवर अगदी जवळून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी टायगर कारमध्ये बसलेला होता. हल्लेखोराने अवघ्या दोन फुटांवरून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला; मात्र पिस्तूल जाम झाल्यामुळे गोळी सुटली नाही. आरोपीने दोनदा ट्रिगर दाबूनही गोळीबार करता आला नाही.

हल्लेखोरांनी गोळीबारासाठी गावठी पिस्तूल वापरल्याची माहिती समोर आली आहे. पिस्तुलातील तांत्रिक बिघाडामुळे टायगर श्रॉफचा जीव वाचला असावा, असा संशय तपास यंत्रणांना आहे.

४५ मिनिटे रेकी, गोळीबारानंतर मोटरसायकल सोडली; आरोपी सुरतच्या दिशेने फरार?

हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी परिसराची रेकी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गोळीबार करण्यापूर्वी हे हल्लेखोर जुहूतील पुष्पा पार्कजवळ सुमारे ४५ मिनिटे थांबले होते. हल्ला केल्यानंतर तिन्ही आरोपी तिसऱ्या साथीदाराने तयार ठेवलेल्या मोटरसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाले.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून ओळख पटू नये, या उद्देशाने त्यांनी एका पोलीस चौकीजवळ मोटरसायकल सोडून दिल्याचा संशय आहे. त्यानंतर आरोपी सुरतच्या दिशेने फरार झाले असावेत, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी विविध पथके काम करत असून, हल्ल्यामागील नेमका हेतू आणि कटात सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!