गुजरातचा भाजपचा नेता शिवरायांना पाटीदार असल्याचं म्हणाला, संजय राऊतांनी भाजपला धू-धू धुतलं, म्हणाले..

मुंबई : सध्या महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकीचे रणकंदन सुरु आहे. असे असताना सुरतमध्ये पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते, असे वक्तव्य केले आहे. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्यावरून भाजपवर निशाणा साधला.

हा महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा फार मोठा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हिंदवी स्वराज्याचे दैवत आहे. जसे अनेक युगपुरुष भारतीय जनता पक्षाने पळवायचा प्रयत्न केला, असे खासदार संजय राऊत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती, पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती हे विसरू नका, असा हल्लाबोल त्यांनी केला.
तसेच ते म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर हे पळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. शेवटी आता ते छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातला पळवायचा प्रयत्न करत आहेत. कारखाने पळवले, जमिनी पळवल्या, शिवसेना पळवली, राष्ट्रवादी काँग्रेस पळवली, अधूनमधून बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत त्यांना प्रेमाचा उमाळा येतच असतो.

उद्या ते बाळासाहेब ठाकरे देखील पळवतील. आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले आहेत. हे निर्लज्ज लोक आहेत. आराध्य दैवत तुम्ही पळवत आहात. तुमच्याकडे काही दैवत नाही का? गुजरातमध्ये सगळे राक्षस, बकासुर आहेत का? तुमच्या गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्मालाच आलेले नाहीत का?
असेही ते म्हणाले.
तुम्हाला आमची दैवतं पळवण्याचा बकासुसुरी आनंद घ्यायचा आहे, असा घणाघात देखील त्यांनी केला. यामुळे वातावरण तापले आहे. सध्या महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकीचे रणकंदन सुरु आहे. यामुळे आता प्रचारात हे वक्तव्य चांगलेच गाजणार आहे. याबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत.