शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 31 जुलैपूर्वी 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा; मुख्यमंत्र्यांची घोषणा


पंढरपूर : महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026’ सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पंढरपुरात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे आणि नव्या पीक कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, योजनेच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे 17 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपूर्वी कर्जमुक्तीची रक्कम थेट डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या याद्याही टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येतील.

या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार असून, ग्रामपंचायत, सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही लाभार्थी याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी राज्य सरकारच्या इतर शेतकरीहिताच्या निर्णयांचाही उल्लेख केला. 48 हजार कोटी रुपयांची वीजबिल माफी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सध्या राज्यातील सुमारे 75 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत असून, डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांना 12 तास दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. राज्यभरातील सुमारे 32 हजार ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मध्ये आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सरकारच्या मते, ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून शेतीला नवे बळ देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!