पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे ते युरोप विमानसेवा लवकरच सुरू होणार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती..

पुणे : पुणे विमानतळावरून थेट युरोपसाठी विमान सेवा सुरू होणार असल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केले आहे. या सेवेच्या माध्यमातून पुण्याची आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी लक्षणीय वाढणार आहे. यामुळे आता मुंबई दिल्लीला जाण्याचा त्रास कमी होणार आहे.
सध्या पुणे विमानतळाची धावपट्टी आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी पुरेशी लांब नाही. त्यामुळे युरोपसाठी थेट विमानसेवा सुरू करता येत नव्हती. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचे काम आता पूर्ण झाले असून, सर्व विमानसेवा जुन्या टर्मिनलवरून नव्या टर्मिनलमध्ये हलवण्यात आल्या आहेत. जुन्या टर्मिनलचा पुनर्विकासही वेगात सुरू आहे.
यामुळे एकंदर विमानतळ व्यवस्थापनाची क्षमता आणि सुविधा दोन्ही सुधारतील. आता सुमारे ३०० एकर जागेचे भूसंपादन करून धावपट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण शक्य होणार आहे. आजघडीला युरोपसह अन्य आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर जाण्यासाठी प्रवाशांना मुंबई विमानतळावर अवलंबून राहावे लागते.
असे असताना मात्र, धावपट्टीच्या विस्तारामुळे ही अडचण दूर होणार असून प्रवाशांना थेट पुण्यातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाचा लाभ मिळणार आहे. नवीन टर्मिनलच्या कामकाजामुळे विमानतळाचा प्रवासी वहन क्षमतेत मोठी वाढ होईल. पुढील काही वर्षांत पुण्याचा विमानतळ अधिकाधिक आंतरराष्ट्रीय सेवा देणारा महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
पुणेकरांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी खर्चाचे वाटप विविध यंत्रणांमध्ये करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार ६०% खर्च, तर पुणे महापालिका २०%, पिंपरी-चिंचवड महापालिका १०%, आणि पीएमआरडीए १०% खर्च उचलणार आहेत. यामुळे कामाला गती मिळणार आहे.