मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर! प्रवास होणार अधिकच सोप्पा, वाचा सविस्तर…

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई आणि पुणे याच्यातील प्रवास आणखी जलद आणि सुरळीत होण्यासाठी आता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आठ पदरी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
निसर्गरम्य घाटांमधून जाणाऱ्या या मार्गावर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. तसेच मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे हे महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाचं आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत व्यस्त असलेलं रस्ते जाळं आहे.
नवी मुंबईतून पुढे जाताना सह्याद्रीच्या रांगांतून वळणावळणाच्या रस्त्याने जाणारा हा मार्ग केवळ प्रवासाचे साधनच नसून निसर्गाच्या सौंदर्याची अनुभूती देणारा प्रवासही ठरतो. मात्र अलीकडच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
सध्या या एक्स्प्रेसवेवर प्रत्येक दिशेसाठी तीन लेन आहेत. मात्र सकाळी-रात्री, सुट्ट्यांच्या दिवशी आणि आठवड्याच्या शेवटी येथे मोठी वाहतूक जाम होते. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी प्रत्येक दिशेसाठी आणखी एक लेन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यानंतर हे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. हे काम वेळेत पूर्ण झाल्यास भविष्यात प्रवास अधिक गतीमान आणि सोयीस्कर होणार आहे.
दरम्यान, एकूण ९४ किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दररोज सुमारे ५० ते ६० हजार वाहनांची वाहतूक होते. यातील घाट भागात १३ किलोमीटरचा ‘मिसिंग लिंक’ आधीच आठ पदरी करण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित ७५ किलोमीटरचा रस्ता देखील आठ पदरी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संपूर्ण एक्स्प्रेसवे समान रुंदीचा होईल आणि प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांवर नियंत्रण मिळेल.